Monday, July 27, 2020

Thank You

माझ्या office च्यासमोर असलेल्या conference रूममध्ये बरेचदा नवीन उमेदवारांच्या मुलाखती होतात. अशाच एका मुलाखतीतले शेवटचे संभाषण कानी आले. आलेल्या उमेदवाराने शेवटच्या एक-दोन मिनिटात कमीत कमी आठ-दहा वेळा थँक्यू म्हटले असावे (यावेळेस मोजले नाही पण पुढच्या वेळेस मोजायचा विचार आहे). आणि हे फक्त त्याच्या एका माणसाच्या भेटीनंतर.  त्या दिवशीच्या त्याच्या मुलाखतीमध्ये कमीतकमी आणखीन दहा जणांची भेट नक्कीच ठरली असेल. म्हणजेच हा मनुष्य आजच्या दिवसात थँक्यूच शतक पूर्ण करणारतर !! तेवढ्यात, मला दुसरी मिटिंग असल्यामुळे मी माझ्या कामाला लागलो. कर्मधर्मसंयोगाने त्याच दिवशी त्या माझ्या मीटिंगमध्ये आणखीन एक ‘थँक्यू महाशय’ भेटले. म्हणजे त्यानी मांडलेल्या मुद्यावर कोणी कॉमेंट केली की या महाशयांच पहिलं वाक्य ठरलेल “थँक्यू फॉर युवर कॉमेंट”; आणि एखादी कॉमेंट त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडून आली असेल तर आणखीन मुलामा म्हणजे  “थँक्यू फॉर युवर कॉमेंट, आय रियली ॲप्रिशिएट इट”.  म्हणजे आधी थँक्यू, मग ॲप्रिसिएशन, पुढे आता तो लोटांगण घालणार का काय? असा मला प्रश्न पडला !!


एकूणच, या थँक्यू प्रकाराबद्दल माझं काही चांगलं मत नाही हे माझ्या ओळखीतल्या माझ्या मित्रांना चांगलंच माहिती आहे; किंबहुना, त्यावरून मी बरीच बोलणी सुद्धा ऐकली आहेत. तरीही प्रामाणिकपणे बोलायचं म्हटलं तर आजच्या या जगात थँक्यू चा पूर आलेला आहे का सुनामी आली आहे? असाच मला प्रश्न पडतो. म्हणजे मी कोणाला घरी बोलावलं तर तो मला थँक्यू म्हणणार, मग मी त्याला रिटर्न थँक यु म्हणणार, मग हाच प्रकार व्हाट्सअप ग्रुप वर होणार, आणि मग फेसबुक, ट्विटर इत्यादी इत्यादी. तर या थँक्यू विषयी मनातल्या काही आठवणी लिहून काढाव्यात असं वाटलं म्हणून हा खटाटोप. त्यातूनच ११ जानेवारी हा ‘International Thank-You Day’ असल्यामुळे ह्या अंकाची वेळही बरोबर साधली गेली.


सर्वप्रथम आपण थँक्यू कोणाला म्हटलं असेल? (‘आपण’ हा माझ्यासाठी आदरार्थी शब्द वापरताना जरा मान मिळाल्यासारखं वाटतंय, त्यामुळे माझंच मला एकदा “थँक्यू”) असा डोक्यात विचार आला आणि लक्षात आले बालपणी मी हा शब्द वापरला आहे अशी आठवणच नाही आहे.  कसे काय माझे एवढे मित्र झाले देवालाच ठाऊक. हा कदाचित कल्चरल डिफरन्सही असेल. मला आठवतंय, मी सहावी-सातवीत होतो तेव्हा आमच्याकडे माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी दोन-चार दिवस रहायला आली होती. ती रोज सकाळी उठलीकी सगळ्यांना ‘गुड मॉर्निंग’ म्हणायची. मला तर फार ओशाळल्या सारखं व्हायचं. मग कुठेतरी इकडे तिकडे बघून, किंवा विचित्रपणे हसून, किंवा मनातल्या मनातच काहीतरी पुटपुटून वेळ मारून न्यायची. ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘थँक्यू’ चा तसा संबंध नाही, परंतु कल्चरल डिफरन्सचा विषय निघाला म्हणून ही आठवण.


माझ्या आयुष्यातला थँक्यू बद्दलचा पहिला प्रसंग मला आठवतोय तो म्हणजे मी कॉलेजला होतो तेव्हाचा. का कोणास ठावूक पण काही दिवस बाबांना सायकल चालवायची नव्हती. त्यामुळे अस्मादिकांना (परत एकदा माझं मला थँक्यू) बाबांना कॉलेजला सोडायची वेळ आली. बाबांना त्यांच्या कॉलेजच्या गेट पाशी सोडलं आणि मी निघणार तेवढ्यात कानावर शब्द पडले “थँक्स”!! म्हणजे खुद्द माझ्या बाबांनी मला त्यावेळेस थँक्स म्हंटले. हे किती विचित्र आहे? आजच्या जगातही हे मला ते विचित्र वाटतं तर त्या वेळेस २५ वर्षापूर्वी काय वाटलं असेल असा विचार करा. बरं गम्मत अशी की “थँक्यू” नंतर “वेलकम” म्हणायचं असतं हेसुद्धा त्यावेळेच्या त्या कॉलेजकुमाराला माहिती नव्हतं.


त्यानंतरचा प्रसंग आठवतो तो म्हणजे पुण्यनगरी मधला, जिथे आम्ही नोकरीसाठी वास्तव्य करत होतो. पुण्याला आमची मोठी फॅमिली आहे. माझ्या वडिलांना चार भाऊ, दोन बहिणी आणि ते सगळे पुण्यात असतात. तर, माझ्या एका भावाचा रात्री-अपरात्री पुणे-मुंबई रोडवर मोटारीचा अपघात झाला होता. काकांनी मला बोलावून घेतले आणि आम्ही दोघे घटनास्थळी गेलो. गाडी बघून या अपघातामध्ये कोणी जिवंत वाचलं असेल असे वाटले नाही. मनात चर्र झाले, पण लागलीच भाऊ पुढे आला आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला (१९९९ सालच्या त्या Opal Astra गाडीचे डिझाईन करणाऱ्या इंजिनीयरला खरोखरचा थँक्यू!). त्या संपूर्ण रात्री मी गाडीपाशी थांबलो. सकाळी गाडी पुण्याला न्यायची सोय झाल्यावरच माझी तिथून सुटका झाली. त्यानंतर पंधरा दिवसांनी मला एका शर्टाचे कापड बक्षीस म्हणून मिळाले. ते माझे थँक्यू गिफ्ट होते.  त्यावेळेला मला नुसते विचित्र वाटले नाही तर कापड देणाऱ्याचा थोडाफार राग सुद्धा आला. नातेवाईक हे एकमेकांची मदत करायला असतात ना? मग, एकाने दुसऱ्याच्या अडचणीत त्याला मदत केली तर थँक्यू कशाबद्दल? अर्थात, आता वीस वर्षे उलटून गेल्यावर त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत नाही. जगाची रीतच तशी आहे.  त्यात काय विशेष? आणि अशामुळेच कधी कधी वाटते की बरेचदा थँक्यू हे रीतीनुसार किंवा एका सवयीप्रमाणे म्हटले जाते. उदाहरणार्थ: हॉटेलमध्ये वेटरने आपले पदार्थ आणून दिल्यावर “थँक्यू”.  खरतर ते त्याचे कामच नाही का? आणि त्याला त्याची टीपही मिळणार असते. बँकेमध्ये आपलेच पैसे आपण काढून आणले तरी कॅशियरला “थँक्यू”.  एवढेच काय पोलिसांनी आपल्याला ट्रॅफीक तिकीट दिल्यावर सुद्धा त्याला थँक्यू!! कधीकधी तर घरी रॉंगनंबरचा फोन आला असेल तरी तिकडच्या माणसाला थँक्यू म्हणणारी मंडळी मी पाहिली आहेत. 


या ‘थँक्यू’ मुळे लोक एकमेकांशी प्रेमळ वागत आहेत, तर त्यात वावगे ते काय? असाही विचार मनात येऊ शकतो.  तर, वाईट हे की  ‘थँक्यू’ म्हणण्याबरोबर ते ऐकण्याची पण सवय होते.  आणि लोकांच्या एकमेकांकडून अपेक्षा वाढतात. माझ्या मित्राने आठवण करून दिल्याप्रमाणे Seinfield च्या एका एपिसोड मध्ये गाडी चालवतानाची ‘Thank you wave’ याचा भरपूर  ऊहापोह झालेला आहे, तरी माझ्या बाबतीत नुकताच घडलेला एक किस्सा सांगतो. एका दुकानातून मी माझ्या मुलीशी बोलता-बोलता बाहेर आलो त्यावेळेस एकाबाईने दुकानाचे दार आमच्यासाठी धरून ठेवलं होते; पण मी मात्र “थँक्यू” म्हणायचे विसरलो.  त्यानंतर त्या बाईने खाष्टपणे मला स्पष्ट ऐकू जाईल अशा आवाजात “यू आर वेलकम” असे म्हटले. आता खरं म्हणजे मी काही त्या बाईला दार धरून ठेवायला सांगितले नव्हते. तिने ते सामाजिक भावनेपोटी धरून ठेवले असावे हे मान्य. पण म्हणून अनावधानाने झालेल्या त्या चुकीबद्दल एवढा राग? याचे कारण म्हणजे सध्याच्या समाजात सुरू असलेली ‘थँक्यू’ ची चढाओढ आणि त्यामागून वाढलेली लोकांची अपेक्षा असे म्हंटले तर वावगे ते काय?


असे असताना, भारतीय संस्कृतीमध्ये मात्र थँक्यू म्हणायचे प्रमाण कमी वाटते. त्याची कारणे निराळी असतील. कदाचित इतरांना मदत करण्यात पुण्य करण्याची भावना असून त्या पुण्याचा हिशोब सर्वादिसर्व देव करणार अशा संकल्पनेमुळे एकमेकांना थँक्यू म्हणायची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये तितकीशी प्रचलित झाली नसावी. आणखीन एक वैचारिक मुद्दा मांडायचा म्हटले तर नमस्कार करण्याचा आपल्या पद्धतीमध्ये मोठ्या माणसांना नकळत ‘थँक्यू’ म्हणणे असा आविर्भाव असावा. असो भारतीय संस्कृतीसारख्या उच्च विषयांवर माझ्यासारख्या सामान्य माणसाने भाष्य करणे बरोबर नव्हे. शेवटी काळानुरूप आणि देशानूरूप स्वतःला बदलून घेणे हाच शहाणपणा आहे.  


गेले दोन महिने माझा उजवा पाय फ्रॅक्चर आहे त्यामुळे शरीराचा सर्वभार डावा पाय सांभाळतो आहे.  त्यामुळे उजव्या पायातर्फे डाव्या पायाला थँक्यू! थँक्यू!! थँक्यू!!!


आणि हो इथपर्यंत पोचलेल्या सगळ्या वाचकांना रीतीनुसार नाही तर मनापासून थँक्यू! थँक्यू!! 

Labels:

4 Comments:

At July 27, 2020 at 9:48 PM , Anonymous Anonymous said...

Hello nice

 
At July 27, 2020 at 9:49 PM , Anonymous Anonymous said...

Nice 2

 
At July 28, 2020 at 5:53 AM , Blogger Vidula said...

लेख आवडला

 
At July 28, 2020 at 5:54 AM , Anonymous Anonymous said...

लेख आवडला

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home