चारही दिशा चीत पण आपला मेरीलँड फिट
मी गेली अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहे. अमेरिकेतील विविध राज्यांतून प्रवास करताना मला नेहमी आश्चर्यचकित करणारा विषय म्हणजे इथल्या राज्यांच्या सीमा. अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांच्या सीमा सरळ रेषेत आहेत. मग त्या उत्तर-दक्षिण असोत वा पूर्व-पश्चिम. पश्चिमेकडील राज्यांकडे नजर टाकली तर ही गोष्ट आणखी प्रकर्षाने जाणवते. दोन वर्षांपूर्वी ‘व्हर्जिनिया’ (Virginia) राज्यामधील Williamsburg या गावात जाण्याचा योग आला. त्या गावामध्ये फिरताना साहजिकच थॉमस जेफरसन (Thomas Jefferson ) यांचा उल्लेख जागोजागी येत होता आणि एक गोष्ट लक्षात आली की त्याकाळीसुद्धा थॉमस जेफरसन यांनी व्हर्जिनिया राज्य आणि एकूणच त्या प्रदेशाची भौगोलिक दृष्ट्या माहिती मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. ह्या माहितीचा त्या वसाहतीच्या सीमा ठरवण्यात बहुमूल्य उपयोग झाला. तेंव्हाच मनात प्रश्न पडला की आपल्या मेरीलँड (Maryland) राज्याच्या सीमा कशा ठरल्या असाव्या? खरं म्हणजे असे अनेक प्रश्न मला पडतात आणि काही दिवसात कामाच्या व्यापामध्ये ते विसरले जातात. त्यातलाच हा एक प्रश्न. योगायोगाने काही दिवसांनी लायब्ररीमधे पुस्तके चाळत असताना एक छान पुस्तक हाती लागले आणि त्या प्रश्नाची पुन्हा आठवण झाली. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘How the States Got Their Shapes’ by Mark Stein. ह्या पुस्तकात प्रत्येक राज्याच्या सीमांबद्दल व्यवस्थित तपशीलवार माहिती दिली आहे. आपल्या मेरीलँड (Maryland) बद्दलची माहितीही गमतीदार आहे. ती वाचल्यावर 'चारही मुंड्या चीत' म्हणतात तसे मेरीलँडला 'चारही दिशा चीत' असे म्हणावेसे वाटते.
ढोबळमानाने पहिल्या १३ वसाहतींबद्दल माझी कल्पना अशी होती की जशा जशा वसाहती स्थापन होत गेल्या तशा तशा त्यांच्या हद्दी घडत गेल्या. आणखी एक ढोबळ तर्क असा की नैसर्गिक आणि महत्त्वपूर्ण खुणांनुसार भौगोलिक सीमा पडल्या असाव्या. काही अंशी हे तर्क बरोबरही आहेत. उदाहरणार्थ मेरीलँड ची दक्षिण सीमा ही बहुतांशी ‘चेसपिक बे’ (Chesapeake bay) आणि ‘पोटोमॅक’ (Potomac) नदी अशा नैसर्गिक पद्धतीने घडलेली आहे. परंतु आपल्या राज्याच्या सीमेबद्दलच्या बऱ्याच गोष्टी मला बुचकळ्यात सुद्धा टाकतात. उदाहरणार्थ मेरीलँड राज्याची पूर्वसीमा. ही सीमा बहुतांश भागात एक सरळ उभी रेष ओढावी अशी आहे. आणखीन एक मजेदार गोष्ट म्हणजे 'डेलमारवा' (Delmarva) ह्या चेसिपिक बे आणि अटलांटिक महासागर ह्यांच्यामधील द्वीपकल्पातील (penninsula मधील) बरोबर एक काटकोन-त्रिकोणी भाग मेरीलँड मधून वगळला गेला आहे. हा भाग म्हणजे 'डेलावेर' (Delaware) हे राज्य होय. मेरीलँड ची उत्तर सीमा ही बरोबर सरळ आडव्या रेषेत आहे, पण त्या रेषेमुळे एके ठिकाणी राज्याचा काही भाग इतका अरुंद झाला आहे की राज्याचे दोन तुकडे केल्यासारखे वाटतात. हे असे का हे जाणून घ्यायचे असल्यास पुढील लेख नक्की वाचा.
आता मेरीलँड ला चारही दिशा चीत म्हणण्याचे संदर्भ सांगतो. पूर्व, पश्चिम, उत्तर, आणि दक्षिण अशा चारही दिशांच्या सीमांबद्दल मेरीलँडला पराभव पत्करावा लागला आहे. उत्तर सीमेवरील पराभव त्यातल्यात्यात समजायला सोपा. चार्ल्स राजाच्या आदेशावरून १६३२ साली नवीन जगात इंग्लंडमधल्या कॅथलिक लोकांना स्थान मिळावे म्हणून मेरीलँड ची निर्मिती झाली. कालांतराने १६८२ साली विल्यम पेन (William Penn) ला मेरीलँडच्या उत्तरेला वसाहत स्थापन करण्यास सांगण्यात आले. ही वसाहत म्हणजेच पेनसिल्वेनिया (Pennsylvania). त्यानुसार ४० उत्तर अक्षांश ही मेरीलँड आणि पेनसिल्वानिया या दोन्ही वसाहतींची हद्द ठरवण्यात आली होती. परंतु William Penn यांच्या नकाशामधे ४० उत्तर अक्षांश चुकून दक्षिणेला काढण्यात आले होते. ह्या चुकीच्या नकाशामुळे पेन आणि मेरीलँड ह्यांच्या मधे वाद उद्भवला. त्यात आणखी भर म्हणजे खरी ४० उत्तर अक्षांश रेषा ही पेन ह्यांनी ठरवलेल्या फिलाडेल्फिया (Philadephia) ह्या त्यांच्या वसाहतीच्या राजधानीमधून जात होती. अर्थातच फिलाडेल्फियासारखे शहर मेरीलँडला स्वाधीन करणे पेन आणि त्यांच्या वसाहतीला मान्य नव्हते. हा मेरीलँडचा उत्तर सीमा वाद बरीच वर्षे चालू होता. जवळपास ५० वर्षांनंतर, म्हणजे १७३२ साली, पूर्वेकडील सीमेचा वाद टाळण्याच्या संदर्भात मेरीलँडचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बाल्टिमोर ह्यांनी माघार घेऊन पेनसिल्वेनियाच्या मागणीला मान्यता दिली खरी पण त्या ठरावात आपण पूर्वेकडील आणि उत्तरेकडील दोन्ही बाजूने जागा गमावून बसलो ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी परत वाटाघाटी सुरु करण्याची मागणी केली. अर्थातच दातओठ खात बसण्याशिवाय मेरीलँडच्या वाट्याला काहीही आले नाही. अखेर १७६३ मधे चार्ल्स मेसन (Charles Mason) आणि जेरेमाया डिक्सन (Jeremiah Dixon) या दोन तज्ज्ञांच्या कमिशनने पेनसिल्वेनियाची पाठराखण करत उत्तर सीमेवरती शिक्कामोर्तब केले. हीच ती मेसन डिक्सन लाईन. ह्या रेषेमुळे एके ठिकाणी मेरीलँडचा प्रदेश इतका लहान झाला की त्याचे दोन तुकडे पडल्यासारखे वाटतात.
आता पूर्व सीमेवरती मेरीलँडला माघार का घ्यावी लागली त्या इतिहासाबद्दल. ह्या इतिहासात डेलावेरच्या निर्मितीचाही इतिहास दडलेला आहे. थोडक्यात म्हणजे, मेरीलँडची वसाहत स्थापन झाली तेंव्हा चेसपीक बे च्या पूर्वेला म्हणजेच 'डेलमारवा' ह्या द्वीपकल्पावर डच लोकांच्या वसाहती होत्या. मेरीलँडच्या निर्मितीनंतर ४० वर्षांनी इंग्लंडने डच लोकांना हद्दपार केल्यावर तो भाग कोणी घ्यायचा हा वाद उत्पन्न झाला. अर्थातच, मेरीलँड आणि पेनसिल्वेनिया ह्या दोघांनीही त्यावर दावा टाकला. भौगोलिक दृष्टीने विचार करता ह्या भागाचा मेरीलँड मधे समावेश करण्यात काहीच हरकत नव्हती. मात्र ह्या भागात पूर्वीपासून राहणाऱ्या प्रोटेस्टंट पंथीयांनी मेरीलँडमधल्या कॅथलिक लोकांमध्ये सामील होण्यास नकार दिला. त्यावेळचा इंग्लंडचा राजा प्रोटेस्टंट असल्यामुळे त्याने प्रोटेस्टंट लोकांची बाजू घेऊन हा भाग पेनसिल्वेनिया वसाहतीला भाडेतत्वावर दिला. ह्या निर्णयाविरुद्ध मेरीलँड ने बरेचदा दाद मागितली. परंतु काही फरक पडत नव्हता. शेवटी मेरीलँड च्या गव्हर्नर लॉर्ड बाल्टिमोर ह्यांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला आणि 'डेलमारवा' ह्या द्वीपकल्पाचे साधारणतः दोन समान भाग करण्यात आले. त्याचीच एक उभी रेषा आपल्याला नकाशात दिसते. ह्या दोन भागांपैकी पश्चिमेचा भाग मेरीलँड ला देण्यात आला तर पूर्वेकडच्या भागाचे 'डेलावेर' हे राज्य तयार झाले. डेलमारवाचा भाग घेण्याच्या तडजोडीमध्येच लॉर्ड बाल्टिमोर ह्यांनी मेरिलँड ची उत्तरसीमा १५ मैल दक्षिणेकडे सरकावण्याचे मान्य करून बराच भूखंड गमावला. डेलमारवाचे दक्षिण टोक हे पहिल्यापासून व्हर्जिनियाचे असल्यामुळे तो भाग तसाच व्हर्जिनियाकडे राहिला. एकूण काय तर ह्या छोट्याशा द्वीपकल्पाचे तीन तुकडे तीन वसाहतींमध्ये विभागण्यात झाले. मेरीलँड सीमेविषयी आणखीही बरेच काही बारकावे आहेत. पण एकंदरीत मेरीलँडला सर्व सीमेवरती येनकेन प्रकारेण पराभव पत्करावा लागलेला आहे. मात्र हे सगळे पराभव पत्करुनही मेरीलँड प्रगतीपथावर राहिले आणि आज ते देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
5 Comments:
वा वा सुरेख
मस्त
Thank
प्रहर
Very good
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home